Friday, January 28, 2011

पंगत

बहुतेक लग्न ही उन्हाळ्याच्या सुट्टीतच असतात. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो की लग्नाचा सिझन सुरू झालेला असायचा. गावी लग्नाचं ठिकाणं म्हणजे गावा जवळच एखादं मोठं शेत, शाळेसमोरच पटांगण किंवा देवळाजवळच पटांगण हे ठरलेलं. रंगीबेरंगी कपड्यांचा मांडव अश्या जागी घातलेला असतो. सकाळी ११.३० पर्यंत साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला की वेळ होती ती जेवण्याच्या पंगतीची.


गावच्या लग्नाला जेवण म्हणजे .. डाळ, भात, बुंदि आणि शाक (बटाटे आणि चना किंवा वाटाणा याची झणझणीत भाजी)..ईतकी मस्त लागती ही कि बस्स... क्वचित वेगळेपण म्हणून डाळ-भाता ऎवजी असते लाप्सी....पंगतीत काय दिसेल?? पाठीला पाठ लावुन मातीवरच रांगेत बसलेली माणसे, प्रत्येक पंगती समोर जेवणाचे पदार्थ ऍल्युमिनीयमच्या बादल्यांमध्ये घेऊन उभे असणारे वाढणारे वाढपी.. कार्यकारी मंडळी लगेच पानांच्या पत्रावळींवर पाणी शिंपडून वाढायला घेतात.. अश्या पंगतींमध्ये प्रत्येक रांगेसाठी वेगवेगळे वाढपी असायचे.. अर्थातच जेव्हढ्या रांगा जास्त तेव्हढे वाढपी जास्त.. अश्या पंगती मध्ये कुणाला जेवण कमी जास्त मिळणे, वाढप्यांच्या ये-जा मुळे धुळ उडून पत्रांवळींवर बसणे असे गैरसोयीचे प्रकार तर चालायचेच..

सध्या जमाना आहे तो बुफे पद्धतीचा. या बद्दल ज्याला माहीत नाही त्याने लग्नाचे जेवणच जेवले नसेल असे समझुन चला.. तर अश्या पद्धतींमध्ये जेवणाच्या पदार्थांचे टेबल मांडलेले असतात. प्रत्येकाने आपले ताट  घेऊन आपल्याला हवं तितकं घ्यायचं आणि उभ्या उभ्या किंवा बसण्याची सोय असेल तर खुर्च्यांवर बसुन जेवायचं अशी पद्धत असते.. अश्या प्रकारे जेवण वायाही जात नाही आणि कमी जेवणात जास्त लोकांची जेवणं उरकली जातात.

तर हे सगळं लिहीण्याच निमित्त म्हणजे, नुकतच मला एका सत्यनारायणाच्या पुजेसाठी बोलावणे होते. माझ्या मामांच्या चाळीमध्ये सत्यनारायणाची पुजा होती. आमंत्रण देताना त्यांनी सांगितले की बुफे जेवण आहे म्हणून.. चाळीत आणि बुफे ??? चला म्हटलं चवं घेऊन येऊ.. मामाच्या चाळीत पोहचलो. सत्यनारायणाच्या पाया पडतॊ आणि मनात म्हटलं की जेवण चांगलं असू दे.. :) मामा सोबतच जेवणासाठी गेलो.. जेवणाच्या मंडपामध्ये दोन टेबलांवर जेवण मांडलेलं होत.. जेवणाचा मेनू काय असेल?? गेस करा चवन्नी देईल ;)
डाळ-भात, बुंदी आणि शाक... इतकं पोटभरून जेवलो की विचारु नका.. गावच्या सारखीच चव ती सुद्धा मुंबईमध्ये आणि बुफे पद्धतिने म्हणजे स्वर्ग दोन बोटंच उरला होता...

सत्यनारायण पावला त्या दिवशी... ;)

4 comments:

Yogesh said...

आका लहानपणी आम्ही एकपण पंगत सोडायचो नाही...शाक म्हणजे सगळ्यात भन्नाट प्रकार...पंगतीला शाकची जी चव असायची ती कुठेच नाही

विक्रम एक शांत वादळ said...

Ayala Bharich Ideachi Kalpana ahe ki ;)

मुक्त कलंदर said...

पहिली पंगत म्हणजे ताजे आणि सुग्रास भोजन.. बाकी लग्नाच्या पंगतीत जास्त कधी जेवलो नाही.. पण ती चव दुसरीकडे कुठे मिळत नाही हेच खरे..

सारिका said...

चाळीत बुफे म्हणजे सोने पे सुहागा...!!!

बाकी जेवण चांगलं असेल तर...पगंत आणि बुफे दोन्हीही सारखेच...!!!!!