Monday, February 1, 2010

दादासाहेब फाळके


कालच पीवीआर सिनेमागृहामध्ये "हरिशचंद्राची फैक्ट्री " हा चित्रपट पाहिला. अगदी विनोदी आणि उत्साही कथानक आहे. दादासाहेब फाळकेन्नी कोणत्या प्रकारे, कोणत्या परीस्तिथीमध्ये हा चित्रपट बनवला यावर हा चित्रपट आहे. खाली दिलेली माहिती ही अचूक आहे आणि याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना येतो.
दादा साहेबांच्या विचित्र वागण्याला न कंटाळता त्यांच्या प्रत्येक नविन करण्याच्या ध्यासात सहयोग देणारी त्यांची पत्नी खुप भावते. लहान असुनही मोठी कामे करणारा हुशार असा त्यांचा मोठा मुलगा आणि गोंडस असा लहान मुलगा दोघे धम्माल करतात (चित्रपटात). "राजा हरिश्चंद्र" बनवताना भेटलेली नट मंडळी, त्यांच्याकडून काम करून घेताना घेतलेली मेहनत, आणि चित्रपटातले त्यांचे हावभाव एकदम धम्माल करून जातात...
वारंवार पहावा आणि निखळ आनंद घ्यावा असा एक चित्रपट ..पहायला विसरु नका..

-- तुमचा आनंद

स्त्रोत: विरोप

दादासाहेब फाळके

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक.

जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रींफिथ यांचे जे स्थान आहे, तेच स्थान भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचे आहे. चित्रपट तंत्र, वितरण, मूव्ही कॅमेरा हे शब्दही माहिती नसतानाच्या काळात दादासाहेब फाळके ह्यांनी एकहाती प्रयत्न करून पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपटतंत्र आत्मसात करून त्यांनी भारतात चित्रपट निर्मितीचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात. 

दादासाहेब फाळके ह्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे प्रवेश घेतला. याच सुमारास त्यांना फोटोग्राफी, प्रोसेस फोटोग्राफी यांसारख्या गोष्टींचा छंद लागला. काही काळ त्यांनी बडोदा येथील कलाभवनात शिक्षण घेतले. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनामुळे त्यांनी शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. (याशिवाय दादासाहेबांनी जादूविद्या शिकून निरनिराळ्या ठिकाणी जादूचे प्रयोगही सादर केले.)

१९१० च्या सुमारास दादासाहेब फाळके ह्यांनी 'दी लाइफ ऑंफ ख्राईस्ट' हा चित्रपट पाहिला, आणि त्यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यासच घेतला.मित्रमंडळींच्या मदतीने कर्ज उभारून १९१२ साली ते इंग्लंडला चित्रपटतंत्र शिकण्यासाठी गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री मिळवली. भारतात परतल्यावर राहत्या घरातच त्यांनी स्टुडिओ उभारला.

१९१२ मध्येच दादासाहेब फाळके यांनी 'रोपट्यांची वाढ' हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले. द. दा. दाबके व भालचंद्र फाळके यांना प्रमुख भूमिकांसाठी घेऊन दादासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वदेशी चित्रपटाची निर्मिती केली. ३ मे, १९१३ रोजी दादासाहेबांचा पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' मुंबईत (कोरोनेशन सिनेमा येथे) प्रदर्शित झाला. हाच भारतातील पहिला चित्रपट (मूकपट) होय. हा चित्रपट सुमारे ४० मिनिटांचा होता. आपल्या ह्या पहिल्याच चित्रपटात लेखक, रंगवेशभूषाकार, संकलक, कलादिग्दर्शक अशा विविध भूमिका दादासाहेबांनी एकट्यानेच पार पाडल्या. या चित्रपटात हिंदी व इंग्रजी सबटायटल्सची योजना करण्यात आली होती. त्या काळात ते स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. त्यांचा हा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय झाला. युरोपातील संबंधित संस्थाही हा चित्रपट पाहून प्रभावित झाल्या. अनेक परदेशी संस्थांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. पण दादासाहेबांनी ही निमंत्रणे नाकारली, भारतातच राहणे पसंत केले.

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर फाळके यांनी मोहिनी भस्मासूर,  सत्यवान सावित्री, कालिया मर्दन, गंगावतारम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली.१ जानेवारी, १९१८ रोजी त्यांनी 'हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी' स्थापन केली. या कंपनीने तयार केलेले व फाळके ह्यांनी दिग्दर्शित केलेले लंकादहन, श्रीकृष्णजन्म हे चित्रपट विशेष गाजले. लंकादहन हा भारतातील पहिला 'बॉक्स ऑफिस हिट' चित्रपट मानला जातो. लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट त्यांनीच सर्वप्रथम भारतात तयार केले. दादासाहेबांनी एकूण सुमारे १०० चित्रपटांची निर्मिती केली. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, शिक्षण आदी विषयांवरील २५ लघुपट त्यांनी निर्माण केले.

पैसा, मनुष्यबळ सर्वांचाच अभाव असताना अत्यंत निष्ठेने व जिद्दीने दृक्‌श्राव्य माध्यमाची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतिहास घडवला. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, कलात्मक दृष्टीकोन आणि कष्टाळूपणा या भांडवलावर त्यांनी शून्यातून चित्रपट निर्मितीचा पाया घातला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून भारतभर चित्रपट निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले.
   
दादासाहेब फाळके यांच्या योगदानामुळे सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून केंद्र शासनाने 'दादासाहेब फाळके' हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलावंतांच्या बहुमानासाठी सुरू केला.

चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पायाभूत कार्य करणारे, तसेच महाराष्ट्रात पहिला चित्रपट बनवणारे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील अभिमानाचा बिंदू आहेत हे निश्र्चित!

No comments: